सरकारची डोकेदुखी वाढली! नाशकातील काही गावांना जायचंय गुजरातेत

नाशिक : साताऱ्यातील जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीन होण्यासाठी एल्गार पुकारला आहे. त्यातच आता जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील काही गावांनी गुजरातमध्ये विलीनीकरण होण्याची मागणी केल्याने सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांना सोयी सुविधा मिळत नसल्याने तहसीलदार यांना गुजरातमध्ये विलीन होण्याचे निवेदन ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वात दिले आहे. 

सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या गावातील लोकांना रस्ते,पाणी वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा देखील मिळत नाही असा या गावकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून गेल्या काही वर्षांत 24 पुर्ण वीजपुरवठा मिळालेला नाही. दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती व्यवसायात पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरीसाठी होणारे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही.

मात्र, गुजरात मधील शेजारील गावांतील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीजपुरवठा इत्यादी नागरिकांना मिळणाऱ्या सुखसुविधा सुस्थितीत आहेत. पाण्यासाठी येथील लोकांना दूरदूर भटकंती करावी लागते. वैद्यकीय सोयी जवळपास उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावाचा समावेश गुजरातमध्ये करावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी ही मागणी केली आहे

कर्नाटकने महाराष्ट्राला डिवचले

कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडले आहे. कर्नाटकने महाराष्ट्राला डिवचण्यासाठी हे केले असून कर्नाटक सरकारने जतच्या 40 गावांवर दावा केला होता. कर्नटक सरकारने जतच्या गावांना कर्नाटकमध्ये येण्याचं निमंत्रण दिले होते. आता थेट दुष्काळी गावांना पाणी देऊन महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून करण्यात आला आहे.