By चैतन्य गायकवाड |
गुवाहाटी : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and Minister Eknath Shinde) यांनी बंड केल्याच्या पहिल्या दिवशी त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक (MLC Ravindra Fatak) हे देखील बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाल्याची माहिती आहे. रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी दूत म्हणून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरत येथील हॉटेलमध्ये पाठवले होते. मात्र, त्यानंतर आता ते थेट गुवाहटी (Guvahati) येथे दाखल झाले आहेत. आमदार रविंद्र फाटक हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने चर्चा निर्माण झाली आहे. एक-एक आमदार आता गुवाहाटी येथे दाखल होत असल्याने शिंदेंच्या गटात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, राज्यात सत्तांतराचे वारे आता जोरात वाहू लागले आहे.
कृषिमंत्री दादा भुसे देखील सामील… राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada bhuse) तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. कृषिमंत्री दादा भुसे हे माजी मंत्री आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) आणि आमदार रविंद्र फाटक यांच्यासोबत गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. दरम्यान, दादा भुसे यांच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची उत्सुकता संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यात २ आमदार आहेत. त्यापैकी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. दुसरे आमदार कृषिमंत्री दादा भुसे हे मुंबईत होते. ते काय निर्णय घेतात, याबद्दल जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनात उत्सुकता होती. मात्र, आता दादा भुसे देखील गुवाहाटी येथे गेल्याने, त्यांच्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दादा भुसे हे थांबले होते की त्यांना थांबविण्यात आले होते ?… मंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांच्यातील मैत्रीपुर्ण संबंधांची संपूर्ण राज्याला माहिती आहे. तसेच स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर’ या चित्रपटात देखील या दोघांच्या दृढ मैत्रीची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे दादा भुसे हे आपल्या मित्राला साथ देणार का ? असा प्रश्न होता. मात्र, तीन दिवस ते सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड यांनीच पक्षप्रमुखांना एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. त्या प्रस्तावात एकनाथ शिंदे यांनी काही अटी घातल्याची देखील माहिती आहे. मात्र, कट्टर शिवसैनिक समजले जाणारे दादा भुसे हे देखील शिंदे गटात सामील झाले. या सगळ्या घडामोडींमुळे मंत्री दादा भुसे हे मुंबईत थांबले होते की त्यांना थांबविण्यात आले होते, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.