By चैतन्य गायकवाड |
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. काल मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भावनिक आवाहन करून बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर देखील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार वाढताना दिसत आहे. उरलेल्यांपैकी एक-एक आमदार गुवाहाटीकडे जात असल्याची बातमी येत आहे. सध्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) जवळपास ४५ आमदार उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. गुरूवारी सकाळी चार आमदार गुवाहाटीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अपक्ष आमदार आशिष जयस्वाल, दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईतील उरलेल्या आमदारांनीही ठाकरेंना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कट्टर शिवसैनिक असलेले आमदार देखील बंड करत असल्याने, नेमकी त्यांच्या नाराजीचे कारण काय? हा प्रश्न आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार एकत्रित होताना दिसत आहे. शिंदे समर्थक आमदारांनी बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या पत्रावर जवळपास ३४ आमदारांच्या सह्या होत्या. त्यानंतर जवळपास दहा ते अकरा आमदार गुवाहाटीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. गुरूवारी सकाळी शिवसेना समर्थक रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हेही गुवाहाटीत दाखल झाले. तसेच शिवसेनेचे कोकणातील दिग्गज नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही सकाळी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काल शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले मंत्री गुलाबराव पाटील देखील शिंदे गटात सामील झाले आहे.
मुंबईतील शिवसेनेचे आमदार ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दादर-माहीम या मतदारसंघातील सदा सरवणकर आणि कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनीही शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेतील आमदारांची संख्या ४१ वर पोहचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांचा वेगळा गट करण्याचा शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला असून, त्यावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.