By चैतन्य गायकवाड |
गुवाहाटी : शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडे (mla dilip lande) हे गुवाहाटीमध्ये (guwahati) पोहोचले आहेत. काल ते शिवसेनेच्या बैठकीला हजर असल्याची माहिती मिळाली आहे. आज मात्र ते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. आसामधील गुवाहाटी येथे ज्या ‘रेडिसन ब्लू’ नावाच्या हॉटेल मध्ये बंडखोर आमदार थांबलेले आहेत, तिथे आमदार दिलीप लांडे हे पोहचले आहे. हॉटेलमध्ये जाताच त्यांनी आमदारांसोबत हस्तांदोलन केले. तिथल्या आमदारांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, दिलीप लांडे हे शिंदे गटात सामील झाल्याने आता शिवसेनेचे जवळपास ३८ आमदार शिंदे गटात असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करा, अशी अट घालत शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारले आहे. या बंडाला दिवसागणिक बळ मिळताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस या गटातील आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईतील आणखी एक आमदार दिलीप लांडे यांनी देखील आज शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. ते गुवाहाटीत पोहोचले आहेत.
काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीत दिलीप लांडे हे वर्षा निवासस्थानी झालेल्या हजर होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी मी कुठेही जाणार नसल्याचे देखील म्हटले होते. तसेच मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे देखील म्हटले होते. शिवसेनेची साथ सोडणार नाही, असे ते सांगत होते. मात्र, आता आमदार दिलीप लांडे शिंदे गटाकडे गेल्याने, शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
कोण आहे दिलीप लांडे.. दिलीप लांडे मुळचे शिवसैनिक आहे. त्यांनी मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मनसेमध्ये जाऊन ते नगरसेवकही झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कांदिवली मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी माजी मंत्री व काँग्रेसचे नेते नसीम खान यांना मात दिली होती. कालपर्यंत ते मुंबईतच होते. शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, आज अचानक चक्रे फिरली आणि ते गुवाहाटीत पोहोचले आहे.