भाजपच्या हातातून पालकमंत्री पद गेलं, पण नाशिकच्या एका आमदाराला मंत्रीपद मिळणार?

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश महाजनांना भेटणार असा अंदाज बांधला जात होता. मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ दादा भुसे यांच्या गळ्यात पडल्याने आमदारांससह इतरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर केला असल्याचं पाहायला मिळालं. अशात गिरीश महाजनांचे पालकमंत्री पद गेल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातून भाजपला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

महाजनांच्या काळात प्रथमच भाजपला महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यात यश आलं होतं. त्यामुळे महाजन हेच पालकमंत्री होणार अशी अटकळ होती. मात्र महाजनांचा पालकमंत्री पद गेलं असलं तरी महाजन यांच्याशिवाय विधानसभा आणि महापालिका निवडणुका जिंकणं सोपं नाही. भाजपला ‘मिशन विधानसभा’ जर यशस्वी करायची असेल तर नाशिकमध्ये भाजपच्या वाट्याला मंत्रीपद येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून भाजपला मंत्रिपद मिळणं अटळ असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात.

नाशिकमध्ये भाजपची ‘ताकद’

नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे ३ आमदार आहे. मागच्या महापालिका निवडणुका भाजपच्या हाती आलेली एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेत असलेली भाजपची ताकद दर्शवते. मुंबई, पुणे आणि ठाणे नंतर नाशिकला राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये भाजपची चांगलीच ताकद असणं पक्षासाठी प्लस पाॅईंट ठरतो. महाजनांच्या नेतृत्वात नाशिक महापालिकेत भाजपला ताकद मिळाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये २०१७ ला भाजपची एकहाती सत्ता आली होती. २०१४ ते २०१९ या सत्ता काळात भाजपने महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद दिले होते. २०१९ मध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे महाजन हेच पालकमंत्री असतील अशा चर्चा होत्या. महाजन यांनी त्या काळात संघटना मजबूत करताना जिल्हा भाजपमय केला होता.

दादा भुसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न..?

पालकमंत्री पद का मिळालं नाही ? याचे उत्तर त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना दिलं. नाशिकचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी दादा भुसे आग्रही होते. त्यामुळे मीही दादा भुसेंना नाशिकचे पालकमंत्री पद देण्यास होकार दिला असं महाजन म्हणतात. दरम्यान दादा भुसे यांना पालकमंत्री पद देणे एक तडजोड असल्याचं जाणकार सांगतात. सत्तांतरानंतर गौण खनिजासारखं दुय्यम खातं मिळाल्याने नाराज असलेल्या भुसेंना खुश करण्यासाठी नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं असं बोललं जात आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद भाजपच्या हातातून गेल्यामुळे आता भाजपच्या वाट्याला मंत्रिपद येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.