Home » अपघातात मृत्यूंचा प्रश्न गंभीर! नाशकात आता हेल्मेट सक्ती, पोलीस ॲक्शन मोडवर

अपघातात मृत्यूंचा प्रश्न गंभीर! नाशकात आता हेल्मेट सक्ती, पोलीस ॲक्शन मोडवर

by नाशिक तक
0 comment

by : ऋतिक गणकवार

नाशिक : हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांनो आता सावधान नाशिक पोलीस ( Nashik Police) पुन्हा ॲक्शन मोड मध्ये आले असून शहरात पुन्हा 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती मोहिमेला (Helmet enforcement campaign) सुरुवात होणार आहे. हेल्मेट नसल्यामुळे अपघातात मृत्यूंचा प्रश्न गंभीर होत असून याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. अपघातात हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू वाढत आहेत, त्यामुळे नाशिक पोलिसांकडून नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जर हेल्मेट वापरणार नसाल तर कडक कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.


शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत वाहनांची वर्दळ अधिक वाढली असून त्यात प्रामुख्याने दुचाकी ह्या जास्त आहेत. मात्र दुचाकीचे नियम धाब्यावर बसवत अनेक दुचाकी चालक असेच मोकाट फिरताना दिसतात. त्यात सर्वात महत्वाचा नियम म्हणजे हेल्मेट वापरणे, मात्र हाच नियम पायदळी तुडवत अनेक दुचाकी चालक रस्त्यावर फिरताना दिसतात. यामुळे चालू वर्षी हेल्मेट नसल्यामुळे अपघात होऊन 83 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून अपघातात हेल्मेट नसल्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. हेल्मेट नसल्यामुळे अपघातात होणारे मृत्यू थांबवण्यासाठी नाशिक पोलीस पुन्हा अँक्शन मोडवर आले असून मृत्यूंचा हा वाढता आलेख पोलिसांना खाली आणायचा आहे. पोलीस त्यासाठी सज्ज झाले असून शहरात पुन्हा 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती मोहिमेला सुरुवात होणार आहे.

नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचे पोलिसांनी आव्हान केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सूचना ऐकून स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पोलिसांसाठी नाही तर स्वतःसाठी

या आधी देखील हेल्मेट वापरण्यासाठी नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या उपाय-योजना केल्या आहेत. हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, तसेच जागोजागी पोलीस बंदोबस्त करत वाहनधारकांनी हेल्मेट परिधान केलेय की नाही यासाठी पोलीस दिवसभर उन्हा-तान्हात असतात. मात्र नागरिक पोलीस दिसले किंवा फक्त पेट्रोल पंपवर पेट्रोल वाहानात भरेपर्यंत हेल्मेट परिधान करतात आणि नंतर थोडे पुढे गेले की लगेचच उतरवून ठेवतात.

हे असले प्रकार न करता, आपण आपली सुरक्षा म्हणून हेल्मेट परिधान करावे. पोलिसांसाठी नाही तर स्वतःसाठी हेल्मेट परिधान करावे. आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा आपल्या हातात आहे. म्हणून हेल्मेट परिधान करा सुरक्षित राहा.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!