सुरगाणा प्रतिनिधी (दि. ८) : सुरगाणा (Surgana) शहरासह परिसरात तीन-चार दिवसांपासून दिवसरात्र पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना, नार नदीला तसेच खडकमाळच्या ओहोळाला पूर आला आहे. पाऊस सुरूच असल्याने भात लावणीस विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे घराबाहेरील दैनंदिन कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. पावसाचे पाणी शेतीत साचल्याने शेतीकामांना अडथळा येत आहे. चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतरच भात लावणी व शेतीची इतर कामे करता येणार असल्याने, बळीराजाने सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
दरम्यान, एवढ्या दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर आज पहाटेपासून नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाची आज पहाटेपासून संततधार सुरू असल्याने, नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar), इगतपुरी (Igatpuri), सुरगाणा आणि दिंडोरी (Dindori) या तालुक्यांमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या दमदार सरी बरसल्यामुळे धरण साठ्यात देखील वाढ होत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून, इगतपुरी तालुक्यात ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सुरगाण्यात ६२ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ४३.८ मिमी, दिंडोरीत २३ मिमी, नाशिकमध्ये १२ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
इगतपुरीत धुवाधार
पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यात २४ तासांमध्ये ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीत पावसाच्या दमदार आगमनाने दारणा धरण २७.६० टक्के एवढ्या प्रमाणात भरले आहे. तर दमदार सरींमुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा देखील सुखावला असून तालुक्यात शेती कामांना वेग आला आहे.