एकनाथ शिंदे गट-भाजपा सरकारने मारली बाजी !

By चैतन्य गायकवाड

मुंबई: काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी १६४ मते घेत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी विश्वास दर्शक ठरावाची पहिली पायरी जिंकल्याचे दिसून आले. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारची बहुमत चाचणी (Majority test) होत आहे. या बहुमत चाचणीचे अपडेट्स हाती आले आहे. या बहुमत चाचणीत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते पडली, तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून, हे सरकार बहुमतात असल्याचे सिद्ध झाले आहे. तर काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीप्रमाणे आजही चार आमदार तटस्थ राहिले. एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी बाक वाजवून त्यांचे स्वागत केले.

आज सकाळी ११ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट-भाजपा सरकारने बाजी मारल्यानंतर, आजच्या विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर आवाजी मतदान पद्धतीने हे मतदान घेण्यात आले. या विश्वादर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटाच्या बाजूने १६४ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. कालच्या प्रमाणेच आजही एमआयएमचे दोन आणि सपाचे दोन मिळून चार सदस्य तटस्थ राहिले. दरम्यान, आजच्या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीचे अनेक आमदार अनुपस्थित असल्याने तसेच काही आमदारांना सभागृहात येण्यास उशीर झाल्याने, ते मतदानाला मुकले. त्यामुळे या ठरावाच्या विरोधात पडलेल्या मतांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार
काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी हे उमेदवार होते. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली, तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. काल झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे दोन तर एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले.