मासिक पाळीमुळे वृक्षारोपण न करू दिल्याचा विद्यार्थीनीनेच रचला बनाव !

नाशिक : मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये एक विचित्र प्रकार घडला होता. सर्वत्र या प्रकारची चर्चा रंगली होती , एका महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा तर्क या शिक्षकाने लावला असल्याची सांगण्यात आल होत मात्र , आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागल्याच समोर आल आहे .

या बाबत बालहक्क संरक्षण आयोग आणि प्रकल्प अधिकारी यांच्या द्विसदस्यीय समितीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पीडित मुलीनेच हा सर्व बनाव केल्याचं चौकशी अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार, वृक्षरोपणाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत गैरहजर असल्याचं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विद्यार्थीनीला मासिक पाळीमुळे वृक्षारोपण न करू दिल्याची तक्रार या विद्यार्थिनीने थेट आदिवासी आयुक्तांकडे केली होती.


आदिवासी संघटनांसह बालहक्क व महिला आयोगानेही तातडीने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर या द्विसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. अप्पर आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून धक्कादायक खुलासा झाला आहे . ह्या खुलाश्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे .


अहवालात काय म्हटलं
पिडीत मुलगी शाळेत सतत गैरहजर असल्याने तिला आपलं वर्ष वाया जाण्याची भीती होती. सतत गैरहजरीमुळे शिक्षकाने वर्गात बसू न देण्याची तंबी त्या मुलीला दिली होती. याच कारणामुळे तिने हा बनाव रचाल असल्याचं चौकशी अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.