By चैतन्य गायकवाड
मुंबई : काल रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Uddhav Thackeray resigns as CM) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA government) कोसळले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येऊन सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर आज संध्याकाळी नवीन सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsinh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आक्षेप घेत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने काल रात्री ती याचिका फेटाळत राज्यपालांचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचा (MLC) देखील राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. एकनाथ शिंदे हे एकटेच मुंबईत आल्याची माहिती आहे. तर त्यांच्या गटातील उर्वरित आमदार हे अजूनही गोव्यातच आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आज नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी हा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. तर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होण्याची शक्यता आहे. तसेच राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला जात आहे. यावरून देखील शपथविधी आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथविधी सोहळ्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे.