शिंदे गटाने बजावलेल्या व्हीप मध्ये ‘या मुळे’आदित्य ठाकरे यांचे नाव नाही

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. त्यातच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाने विश्वासमताच्या विरोधात मतदान करणाऱ्या आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या शिवसेनेच्या १४ आमदारांविरोधात कारवाई सुरु केली आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. नार्वेकर यांच्याकडे दिलेल्या आमदारांच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.


विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली गेली . त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला. यावेळी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढला होता. त्यात ठाकरे गटात उरलेल्या १६ पैकी एक आमदार संतोष बांगर हे रविवारी रात्री शिंदेगटात दाखल झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारच उरले आणि त्या आमदारांनी गोगावले यांचा व्हीप न जुगारात मतदान केल्याने प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश झुगारून शिंदे सरकारच्या विरोधात मतदान केल्याबद्दल शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र यामधून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरे यांचा नाव नसल्यामागचं कारण शिंदे गटाचे प्रतोद भारत गोगावले यांनी माध्यमांशी बोलतां सांगितले कि “बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही”. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात निर्णय घेतील असंही या वेळी गोगावले यांनी स्पष्ट केलं.