‘भाजप नेत्यावरील ईडी कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा’

संजय राऊत यांना ईडी कारवाईत झालेल्या अटकेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहे. शिवसैनिकांकडून याचा जोरदार निषेध होत आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर भाजपवर जोरदार टीका करत हल्ला चढवला आहे. ईडी कारवाई फक्त भाजपचा विरोध करणाऱ्यांवरच होते. अशा प्रकारचे आरोप भाजपवर केले जाताय. अशात औरंगाबादमध्ये ‘भाजप नेत्यावर ईडी कारवाई दाखवा आणि एक लाख बक्षीस मिळवा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांच्यावतीनं हे बॅनर लावण्यात आले असल्याची माहिती आहे.

‘ईडीची कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाही, हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे’, अशा टीका भाजपवर अनेकदा करण्यात आल्या आहे. भाजप विरोधकांच्या विरोधात ईडीचा गैरवापर करत असल्याचे आरोप देखील करण्यात आले आहे. ‘एकीकडे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राकडून ईडीचा गैरवापर होत आहे. विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. दुसरीकडे भाजपातील एकाही नेत्यावर ईडीकडून कारवाई होत नाही’, असं आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येते. अशात औरंगाबादमध्ये ‘भाजपने नेत्यावर ईडी कारवाई दाखवा आणि एक लाख बक्षीस मिळवा’ अशी बॅनरबाजी करण्यात आल्याने पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळत आहे.

‘भाजपच्या तालावर ईडी कारवाई करते’, अशा संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून व्यक्त होतात. त्यात संजय राऊतांना ईडी कारवाईतून झालेल्या अटकेमुळे पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे आणि औरंगाबादमध्ये मात्र अशा प्रकारे बॅनर लावत भाजपवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.