By Pranita Borse
नाशिकमध्ये जुलै महिन्यात झालेल्या पर्जन्याने ८१ वर्षांनी सर्वकालीन विक्रम मोडीत काढला आहे(record breaking rain in Nashik). १९४१ साली जुलै महिन्यात ५४९.५ मि.मी. पर्जन्यवृष्टी झाली होती. यावर्षी म्हणजे २०२२ साली अजुन जुलै महिना संपलेलाही नाही आणि आजपर्यंत ५५०.६ मि.मी. एवढे पर्जन्य झालेले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये जुलै महिन्यात झालेल्या पावसाने ८१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. तब्बल ८१ वर्षांनी नाशिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला यावेळी पहायला मिळतोय.
मागच्या काही दिवसापासून नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरण १०० टक्क्यांवर आहेत. तर उर्वरित धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने तब्बल ८१ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. नाशिक जिल्हामध्ये जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्हावासियांची पाण्याची चिंता वाढवली होती. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ घाटला होता. त्यामुळे पाणी कपातीचे मोठं संकट नाशिककरांसमोर उभं ठाकलं होतं. मात्र, या पाणी संकटाला अवघ्या २५ दिवसात झालेल्या पावसानं दूर केले आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण ओव्हर फ्लो झाली आहेत आणि नाशिक शहरात जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्हात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. दमदार पावसाच्या हजेरीने जिल्हाभरात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी जीवितहानीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. २५ दिवसांत शहरात दमदार पाऊस झाल्याने ८१ वर्षांचा विक्रम मोडीस निघाला आहे. नाशिक जिल्हात धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे काही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन देखील केले आहे.