राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मात्र अद्याप प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची. अशात २६ जुलैला मंत्रीमंडळ विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार या माहितीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी देखील दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांना विस्ताराबाबत विचारलं असता, ‘अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु’, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
२६ तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ?
राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा होत्या. अशात १९ आणि २० जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अद्याप तरी विस्तार झाला नाही. अशात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागणार असून नवी तारीख सांगितली जातेय. २६ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या. एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटात सामील झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. ३० जुन रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात खातेवाटप कधी होणार? असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जातोय. तेव्हा आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.