सुरगाणा, प्रतिनिधी (दि. ९):
सरण ही थकले मरण पाहुणी..
मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून, प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायत मधील साबरदरा येथील घटना आहे. साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची ही वस्तुस्थिती आहे.
साबरदरा येथे ८ जुलै रोजी एका वयोवृद्ध महिलेचे आक्समिक निधन झाले. त्याचवेळी सकाळ पासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने, कुटुंबाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. साबरदरा येथील स्मशान भूमी कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत. हे ठिकाण नदीच्या काठावर असल्याने नदीला पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते.
ग्रामपंचायत वाघधोंड असून बंधारपाडा व वाघधोंड येथे स्मशान भूमी शेड आहे. मात्र साबरदरा पासून हे अंतर तीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तेथे भर पावसात मृतदेह घेऊन जाता येत नाही. अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला.
तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजूनही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय, हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते. तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वाघधोंड ग्रामपंचायतीत केवळ दोनच गावे समाविष्ट असून साबरदरा येथे अद्याप स्मशानभूमी शेड नाही.
“वाघधोंड ग्रामपंचायत मध्ये साबरदरा व बंधारपाडा ही गावे आहेत. पैकी साबरदरा येथे स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेषत पावसाळ्यात आक्समिक निधन झाले, तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने आम्ही नाइलाजाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल.”
वसंत भोये, (मयत महिलेचा नातू)
“स्मशानभूमी शेड जनसुविधा योजनेतून तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. जागा खाजगी मालकाची असल्याने कागद पत्राची पुर्तता करून काम सुरु करण्यात येईल. स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”
विलास अहिरराव (ग्रामसेवक, वाघधोंड)