By चैतन्य गायकवाड
मुंबई : गेल्या अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आता उपमुख्यमंत्री झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या काळात विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कधी नव्हे ते इतके देवेंद्र फडणवीस यांच्या भोवतीच केंद्रित राहिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणीस यांच्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.
दरम्यान, अखेर विरोधी पक्षनेते या पदाबाबत चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) म्हणून निवड करण्यात आली आहे. अजित पवार आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या नावाची निवड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.
महाविकास आघाडीत आता ५४ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री पदाच्या समान असतो. विरोधी पक्षनेता हा एक प्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून काम करत असतो. ‘विरोधी पक्षनेते’ या पदाची ताकद ही मुख्यमंत्री पदासारखीच आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कोण काम करणार, असा प्रश्न होता.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होते. अजित पवारांनी अतिशय सक्षमपणे राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळले. अजित पवार यांनी मंत्रालयात तसेच राज्यात वेळोवेळी फिरून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले. त्यामुळे अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद मिळण्याची दाट शक्यता होती. तसेच या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नावाची देखील चर्चा होती.