नाशिक वनविभागाच्या पश्चिम भाग क्षेत्रात त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील हरीहर गडावर (Harihar fort) पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशात हरीहर गडावर १७ जुलै पर्यंत पर्यटनासाठी प्रवेश निषिद्ध राहणार आहे (Harihar fort closed for tourist till July 17). अतिगर्दीमुळे व पावसामुळे संभाव्य अपघात होण्याची शक्यता असते. असे अपघात टाळण्यासाठी १७ जुलै २०२२ पर्यंत पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हरीहर गडावर व परिसरात नागरिकांना पर्यटनासाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. हरिहर गडावर 17 जुलैपासून प्रवेश निषिद्ध असल्याचे उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, १७ जुलै २०२२ पर्यंत नागरिकांनी हरीहर गडावर व परिसरात नागरिकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करून नये. मनाई आदेशानंतरही प्रवेश केल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. वरील आदेशाचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाशिक वनविभाग व उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे हे प्रवाही झाल्यामुळे धबधब्यांकडे पर्यटक आकर्षित होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे येथील निसर्गाला बहर आला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. यातच तालुक्यातील हरिहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहे. सुट्टीच्या दिवसांत याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. तेव्हापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावरील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि आठवड्याच्या शेवटी हरिहरगड परिसरात होत असलेली गर्दी लक्षात घेत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी येथील हरिहर गड येथे पर्यटनावर वनविभागाकडून बंदी घालण्यात आली आहे.