कुलूप दुरुस्त करणाऱ्यांनी घातला सहा लाखांचा गंडा

दिवसेंदिवस चोरी मारीच्या घटना तसेच फसवणुकीचे प्रकारात वाढ होत असताना आता कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे. पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी (२६ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी ज्योती रमेश कांबळे (वय ४२,रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलूप दुरूस्तीचे काम शोधत फिरणाऱ्या दोघांना ज्योती यांनी कपाटाचे कुलूप दुरूस्त करण्यास सांगितले. दोघा चोरट्यांनी कपाटाची किल्ली ताब्यात घेत मालकिणीला लोखंडी स्क्रू आणण्यासाठी घराबाहेर पाठविले. दरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सुमारे साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला काही वेळाने स्क्रू घेण्यासठी घराबाहेर गेलेल्या ज्योती कांबळे घरी परतल्यांया तेव्हा चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचे दिसून आले.