नाशिक | म्हणतात ना शिक्षणासाठी वय नसत आणि मनुष्य हा आयुष्यभर विध्यार्थी असतो हे पुन्हा एकदा नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आव्हाटे या गावी बारावीच्या निकाला निमित्त पहायला मिळालं आहे. यंदा नेहमी प्रमाणे जरी मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली असली तरी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एकाच घरातील तिघांनी बाजी मारली आहे. आव्हाटे या गावात राहणाऱ्या देहाडे कुटुंबातील सून दीर आणि सासरे अश्या तिघांनी यंदा झालेल्या बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. सासरे लक्ष्मण देहाडे आणि त्यांच्या मुलगा समीर देहाडे या दोघांना ६४. टक्के मिळाले तर सून ऋतिका जाधव हिला ५५ टक्के मिळाले आहेत.
लक्ष्मण देहाडे यांनी दोन वर्षांपूर्वी दहावीला प्रवेश घेतला होता. त्यानंतर दहावी पास होऊन ११ वी आणि बारावी करत काल लागलेल्या बारावीच्या निकालात त्यांना ६४.५५ टक्के मिळालेत आज लक्ष्मण देहाडे यांचं वय ४८ असून त्यांनी शिक्षण साठी वय लागत नसल्याचं दाखवत आजच्या तरुणांना शिक्षणाच्या बाबतीत सक्षम होण्याचा संदेश दिला म्हटले तर वावगे ठरणार नाही. सून आणि सासरे कला शाखेतून उत्तीर्ण झालेत तर दीर हा वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाला. ४८ वर्षीय लक्ष्मण देहाडे यांना कमी शिक्षण असल्याची उणीव भासत असल्याने आणि एखादी डिगरी मिळून काही तरी साध्य करावे या हेतूने त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मण देहाडे यांना शिक्षणाची कमी भासत असल्याने त्यांनी त्यांच्याबरोबरच कुटुंबातील सर्वानांच शिक्षणाची सवय लावली असल्याचे देखील त्याच्या मुलाने सांगितले आहे. देहाडे कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह शेती बरोबरच लक्ष्मण देहाडे एका शिक्षण संस्थेत करत असलेल्या शिपाई या नोकरीवर अवलंबून आहे. देहाडे म्हणाले कि मला मुलानं बरोबर शिक्षण घेणे आंनददायी वाटत असून पुढे कला शाखेत पदवी पूर्ण करायची असल्याचे सांगितले आहे.