वृद्ध मासे पकडायला पुराच्या पाण्यात; राहिले रात्रभर पाण्यात अडकून

गिरणा नदीचा पूर ओसरला त्यामुळे मासे पकडण्यासाठी वृद्ध नदीत उतरले मात्र अचानक नदीचे पाणी वाढले आणि त्यामुळे वृद्ध नदीतच अडकून पडले. त्यावेळी नदीच्या आजूबाजूला कोणीही नव्हते त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षातही आला नाही. या वृद्धाला रात्रभर पाण्यातच जीव मुठीत घेऊन थांबावे लागले. रात्रभर नदीत बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी सकाळी सुखरूप बाहेर काढले आहे.

तर घडलेली घटना अशी की, गिरणा नदीला पूर आलेला आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन दिवसांपासून काहीशी ओसरली होती. पूर आल्याने मासे मोठ्या प्रमाणत मिळतात त्यामुळे रविवारी सांयकाळी मासे पकडण्यासाठी दादाजी बुधा मोरे (वय ६०) हे गेले होते. त्यावेळी चणकापूर धरणातून ७ हजार क्यूसेक इतका विसर्ग वाढल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्याचा अंदाज न आल्याने मोरे पाण्यातच अडकले होते. ते मच्छीमार आणि पट्टीचे पोहोणारे आहेत मात्र तरी पाण्याचा प्रवाह अधिक आणि खडकाळ भाग असल्याने त्यांनी धाडस करणे टाळले आणि मदतीचा प्रतीक्षा केली . सोबत मोबाइल नव्हता की , आजूबाजूलाही कोणी दृष्टीस पडत नसल्याने ते अडकल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. सकाळी गिरणा पुलावरून कचरा डेपोच्या दिशेला नदीत एक माणूस अडकला असल्याचे काहींना दिसले. त्यातील मग काही लोकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला अग्निशमन दलाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार हे सहकाऱ्यासह घटनास्थळाजवळ पोहोचले. अग्निशमनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दादाजी बुधा मोरे यांना पाण्याच्या बाहेर काढले. रात्रभर पाण्यात राहून मोरे थकले होते. त्यांना धीर देत जॅकेट घालून त्यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.