नाशिक: जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याला (Igatp[uri taluka) सुखावणारी बातमी समोर येतेय. इगतपुरी तालुक्याची तहान भागवणारं भावली धरण (Bhavli dam) १०० टक्के भरलं आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे भावली धरण ओव्हर फ्लो झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मागील वर्षी हे धरण २५ जुलै रोजी भरले होते. यंदा मात्र १५ जुलैलाच हे धरण भरल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे यावर्षी पाऊस उशिरा सुरु होऊनही धरण लवकर भरले. त्यामुळे ही वरुणराजाची किमयाच म्हणता येईल.
इगतपुरी परिसरातील भावली धरण तालुक्याची तहान भागवणाऱ्या आणि सिंचनाचे प्रश्न सोडवणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी आहे. दरम्यान हे धरण १०० टक्के भरलेल्याने इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. भावली धरणासह जिल्ह्यातील इतरही धरण १०० टक्के भरल्याने जून अखेरीस जिल्ह्यावर निर्माण झालेलं पाणीटंचाईचं संकट टळलं आहे.
भावली धरण परिसरात पर्यटकांची वाढणार गर्दी
भावली धरण १०० % भरल्याने धरणातून ओसंडून वाहत असलेलं पाणी आणि धरण परिसराचं मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाचं वरदान असलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पर्यटकांच्या पसंतीस उतरलं आहे. दरवर्षीच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरम्यान पाऊस झाल्यावर या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. जिल्ह्यासह राज्य, परराज्यातील पर्यटक सुद्धा भावली धरणाचे अवर्णनीय सौंदर्य अनुभवत असतात. त्यामुळे भावली धरण परिसर पावसाळी सहलीचे नंदनवन ठरल्याचे प्रतीत होते.