नाशिकमधील प्रकार! महिलेचा विनयभंग करत मारहाण, कोयताही काढला..

नाशिक : शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोक वर काढले असून कोयत्याचा धाक दाखवत महिलेचा विनयभंग (molestation) आणि नंतर मारहाण करण्यात आली. घटनेने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कोयताधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केल्याचा प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या (upnagar Police Stations) हद्दीत घडला आहे. या टोळक्यांकडून कोयता काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील झाला. अश्याने शहरात आता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला मुलगी व नातेवाईकांसोबत उपनगर परिसरात जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये जात होते. दरम्यान इच्छामणी जॉगिंग ट्रॅक (Ichhmani Jogging Track Nashik Road) समोरील रस्त्यावर संशयित आरोपी राकेश कागडा, सचिन कागडा, विनय सौदे हे तिघे संशयित आरोपी दुचाकी वाहनावर आले होते.

यावेळी पिडीतेकडे व पिडीतेच्या मुलीकडे बघून अश्लील हावभाव करून त्यांचा भर रस्त्यात विनयभंग केला. याचा विरोध केला असता त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली, त्यांना धक्काबुक्की केली. सोबत असललेल्या नातेवाईकांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. गाडीतून कोयता काढत धाक दाखवला व परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पिडीतेने उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनुसार या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.

दरम्यान, नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून दिवसा-ढवळ्या गुन्हे घडत आहेत. यावरून या टोळक्यांना पोलिसांचा धाक नसल्याचे स्पष्ट होते. गुन्हेगारी वाढत असून नागरिक आता दहशतीत जगत आहेत. यावर पोलिसांनी गंभीर दखल घेत कडक उपयोजना कराव्यात आता अशी मागणी करण्यात येत आहे.