By चैतन्य गायकवाड
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ४० आमदार आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दोन तृतियांश आमदारांचे बहुमत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडे जाणार का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, “धनुष्यबाण हा आमचाच आहे. तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही.” दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवा, असे निर्देश दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसोबत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी घेताना हसतमुखाने बोलत असतात. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केले. “मलाही भावना आहेत, मलाही वाईट वाटलं आहे. बंडखोरीबाबत मलाही वाईट वाटत आहे. मला कुठेही वादविवाद होऊ द्यायचा नाही.” असे ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली. “गेले ८-१० दिवस मातोश्रीवर मोठ्या संख्येनं लोक येत आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवसेनाप्रमुखांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं असतं. त्यांना कुणीतरी विचारलं होतं की तुम्हाला वाईट वाटतं की नाही? ते म्हणाले होते की माशाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत.” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास ४० आमदार सामील झाले आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ गटाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडले नाही, तर ‘आम्ही म्हणजेच शिवसेना’ असल्याचा दावा देखील केला आहे. त्यामुळेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह (bow and arrow sign) शिवसेनेच्या (Shivsena) हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवा, असे निर्देश दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.