Home » उद्धव ठाकरे घाबरले, त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही…बावनकुळेंचा घणाघात

उद्धव ठाकरे घाबरले, त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही…बावनकुळेंचा घणाघात

by नाशिक तक
0 comment

काल झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर घणाघात केला आता त्यांचावर पलटवार येत असून, माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. 40 आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे,

काल शिवसेनेचा गटप्रमुखांच्या मेळावा होता त्यात ते म्हणाले, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर हक्क सांगण्याचे धाडस करू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या ५ अग्रणी नेत्यांमध्ये माझे आजोबा होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा जनसंघाने समिती फोडली. ही त्यांची औलाद. ही नालायक माणसं आपण जोपासली, एवढे उपरे घेतलेत की बावनकुळे की एकशेबावन्न कुळे हेच कळत नाही असं म्हणत त्यांनी बावनकुळेंवर देखील टीका केली होती.

बावनकुळे म्हणतात माणूस घाबरलाय

बावनकुळे यांनी ठाकरेंच्या टीकेचा चांगलाच कडक समाचार घेतला असून ते म्हणाले, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भीती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भीती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे नैराश्यात

बावनकुळे पुढे म्हणाले की, आमचे 294 सरपंच विजयी झाले त्यामुळे ते नैराश्यात आहेत. त्यामुळेच माझ्या नावाचा उल्लेख ते सारखा करत असतात. भाजप नंबर एकचा पक्ष राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप योग्य वेळी उत्तर देईल. अडीच वर्षात त्यांनी तेच काम केलं. सूड भावनेने राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या दबावात येऊन राजकारण सुरु आहे, असंही ते म्हणाले. भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!