नवी दिल्ही : जम्मू काश्मीर चा वेगवान (faster) गोलंदाज, तसेच आयपीएल (IPL) मधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून प्रतिनिधित्व करणारा उमरान मलिक याची आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa) T-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. उमरान मलिक या २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने यंदाचे आयपीएल गाजवले ते आपल्या भेदक वेगवान माऱ्यातून! त्याच्या या सर्वोत्तम खेळीतून त्याला आंतरराष्ट्रीय (International) पदार्पणाची संधी मिळाली आहे.
उमरानने हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना यंदाच्या आयपीएल मध्ये १३ सामन्यांत २१ बळी घेतले. तसेच त्याच्या वेगवान गोलंदाजीचीही प्रशंसा झाली. अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. येत्या ९ जून पासून भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ T-20 सामन्यांची मालिका (series) होत आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी मायदेशात रंगणाऱ्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचं नेतृत्व लोकेश राहुल कडे देण्यात आले आहे. तसेच आयपीएल टीम पंजाब चा सदस्य असलेला अर्शदीप सिंग यालाही पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. निवड समितीने १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी स्थगित करण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी (test) सामन्यासाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. याच कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा याला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही कसोटी खेळणार आहे. हा सामना १ ते ५ जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.