महिलेला नोकरीच्या बहाण्याने परराज्यात नेऊन ५० हजारात विकले!

उज्जैन येथे नोकरी लावण्यासाठी घटस्फोटीत महिलेला आपल्यासोबत उज्जैन येथे नेले होते. तिथे गेल्यावर सध्या भरती नाही असे सांगत एका युवकाशी पन्नास हजार रुपयांत तिचे लग्न लावून देण्याचा धक्कदायक प्रकार चंद्रपुरातील महिलेसोबत झाला आहे. तसेच याचप्रकारच्या अनेक घटना परिसरात घडल्या असल्याने आता चंद्रपूरात खळबळ उडाली असून भीतीचे वातवरण निर्माण झालेय. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे नोकरी लावण्यासाठी या टोळीने घटस्फोटीत महिलेला आपल्यासोबत उज्जैन येथे नेले होते. तिथे गेल्यावर सध्या भरती नाही असे सांगत एका युवकाशी पन्नास हजार रुपयांत तिचे लग्न लावून देण्यात आले. संबंधित महिलेने विरोध केल्यानंतर तिला उज्जैन येथे एका घरात डांबून ठेवण्यात आले.

त्यानंतर महिलेने बल्लारपुरात आपल्या भावाशी कसाबसा संपर्क केला. भावाच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलिसांनी आरोपींचा माग काढत उज्जैन गाठले. या तपासात चंद्रपूर- विसापूर व बल्लारपूर परिसरात महिला व मुली विकणारी टोळीचा छडा लागला.

उज्जैन येथून आशाबाई वाघमारे आणि स्वप्ना पेंदोर या दोन महिला व घटस्फोटीत महिलेशी लग्न करणारा मदन राठी या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्यातील इतर काही भागात अशाच प्रकारे मुली विक्रीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे काय, याबाबत पोलीस तपास करत आहेत अशी माहिती उमेश पाटील पोलिस निरीक्षक, बल्लारपूर यांनी दिली आहे.

तसेच कोणत्याही आमिषांना बळी पडून अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी