वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आणि मग त्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते, अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालक आणि त्याचा मालक यास तब्बल ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आणि हा दंड भाजप खासदार मनोज तिवारी यांना झाला आहे. त्यांना विनाहेल्मेट दुचाकी चालवणे महागात पडले आहे. वाहतूक पोलिसांनी खासदार आणि वाहनमालक यांना एकूण ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यात मनोज तिवारी यांना २१ हजार रुपये द्यावे लागले आहेत.
तर झालेली घटना अशी की, दिल्लीत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी ज्या बाईक वर जात होते, तेव्हा ते विनाहेल्मेट बाईकवर होते आणि त्यावर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट नव्हती तसेच बाईक चे पीयूसी प्रमाणपत्रही अपडेट नव्हते. हे सर्व वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे खासदार मनोज तिवारी यांना मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्यात आलेला आहे.
दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी माहिती दिली की, ‘आम्ही हेल्मेट , लायसन्स, पीयूसी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) असे नियम चालकाने मोडले आणि या दंडाची रक्कम २१ हजार रुपये आहे. तर वाहन मालकाकडे पीयूसी आणि सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याबद्दल 20 हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला’.
मनोज तिवारी म्हणाले, ‘हेलमेट परिधान न केल्यामुळे मला खेद आहे . मी दंडाची रक्कम भरणार आहे . फोटोमध्ये वाहनाची नंबरप्लेट स्पष्टपणे दिसत आहे आणि लाल किल्ल्याच्या जवळ हे स्थान आहे . तुम्ही विना हेल्मेट बाईक चालवू नका तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाला तुमची आवश्यकता आहे.’