अमरावती: आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) मध्ये एका जिल्हाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणावरून हिंसाचार (violence) उफाळला आहे. आंध्रप्रदेश मधील कोनसीमा जिल्ह्याच्या नामांतराच्या निषेधार्थ अमलापुरम शहरात मंगळवारी हिंसाचार झाला. कोनसीमा (Konaseema) जिल्ह्याचं नाव बदलल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातूनच हा हिंसाचार भडकल्याचं सांगितलं जात आहे. यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करून वाहने पेटवून दिली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी परिवहन मंत्री (minister) पी. विश्वरूपा यांच्या अमलापुरम शहरातील घरावर धडक दिली. तसेच मंत्र्यांचे घर पेटवून दिले. पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले. या हिंसाचारात सुमारे 20 पोलिस (police) जखमी (injured) झाले आहे.
कोनसीमा परिरक्षण समिती, कोनसीमा साधना समिती, कोनसीमा उद्यम समिती आणि अन्य संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रचंड घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कोनसीमा या नावाशिवाय, या जिल्ह्याला दुसरं नाव नको, अशी भूमिका त्यांनी घेतली.
सध्या देशभरातील विविध शहरांची, वस्त्यांची, गावांची तसेच स्थळांची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकाणी या प्रक्रियेचे स्वागत होत असताना काही ठिकाणी मात्र वाद उद्भवताना दिसत आहे.
नेमके प्रकरण काय : अगदी अलीकडेच म्हणजे ४ एप्रिल रोजी आंध्र प्रदेश सरकारने पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती केली. मागील आठवड्यात या जिल्ह्याचे नाव बदलून बी आर आंबेडकर कोनसीमा असे करण्याची प्राथमिक सूचना राज्य सरकारने (state government) जारी केली. सरकराने नाव बदलताच लोकांकडून हरकतीही मागवल्या होत्या. यानंतर कोनसीमा साधना समितीने या प्रस्तावावर हरकत नोंदवत जिल्ह्याचं नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली. कोनसीमा साधना समितीने जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या विरोधात जिल्हाधिकारी (collector) हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचे ठरवले होते. या समितीचे अनेक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. या समितीच्या कार्यकर्त्यांनी अमलापुरम शहरात अनेक ठिकाणी निदर्शने केली. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी अनेक निदर्शकांना अटक केली. या धामधुमीत आंदोलक संतप्त होऊन त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांनतर हिंसाचार उफाळला.
या दगडफेकीत 20 पोलीस जखमी झाले आहे. संतप्त जमावाने पोलिसांची वाहने तसेच बसही जाळली. जमावाने परिवहन मंत्री पी. विश्वरूपा आणि मुंमीदिवरमचे आमदार पी.सतीश यांची घरेही जाळली. पोलिसांनी अनेक निदर्शकांना अटक केली आहे. सध्या अमलापुरम शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी जमावबंदीची घोषणा केली आहे.