अखेर दिवस उजाडला.. विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर (Rajyasabha election) राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची (Legislative Council election) रणधुमाळी सुरु झालेली दिसत होती. अखेर आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस उजाडला. विधासभेच्या सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी आज (दि. २०) मतदान होत आहे. १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उघड मतदानाची पद्धत होती. मात्र, विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत आहे. त्यामुळे या निवडणुकीत होणारी सर्वपक्षीय मतांची फाटाफूट, अपक्ष आणि छोट्या पक्षांनी कुणाच्या बाजूने मतदान करणार याविषयी बाळगलेले सोयीस्कर मौन तसेच धक्कादायक निकालाची परंपरा या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर या विधान परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे आहे. मात्र, या निवडणुकीच्या रिंगणात जवळपास सर्व उमेदवार दिग्गज असल्याने कोण विजयी होणार, यापेक्षा पराभूत कोण होणार, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे.

या निवडणुकीत १० जागांसाठी भाजपाचे (BJP) ५ आणि महाविकास आघाडीचे (MVA) ६ (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी २ उमेदवार) असे एकूण ११ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजप (BJP) पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार की सत्ताधारी महाविकास आघाडी पराभवाची परतफेड करणार, हे बघणे उत्सुकतेचे असेल. याही निवडणुकीत अपक्ष आमदारांची आणि छोट्या पक्षाच्या आमदारांची मते महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या आमदारांना आपल्याकडे वळवण्यात कोण यशस्वी ठरणार, हेही महत्त्वाचे आहे.

या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. तसेच आमदारांना मतदान प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसारखे या निवडणुकीत कुणाचे मत बाद होऊ नये, म्हणून सतर्कता बाळगण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पसंती क्रमानुसार मतदान कसे करायचे याची रणनीती आघाडीकडून ठरवण्यात आली आहे. तसेच तशी माहितीदेखील आमदारांना देण्यात आली आहे.

या विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार भाजप (BJP) : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड.

शिवसेना (Shivsena) : सचिन अहिर, आमशा पाडवी.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे.

काँग्रेस (Congress) : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप.