नाशिक : कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रातील गावांवर दाव्यांमुळे तसेच विरोधक यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) आधीच डोकेदुखी असताना आता त्यात आणखी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील (Surgana Taluka) सुमारे ५५ गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यासंदर्भात तालुक्यातील या ५५ गावातील ग्रामस्थांनी आज बैठकीचे आयोजन ठरवले असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी सुरुवातीला जत तालुक्यावर दावा सांगून वादाला तोंड फोडले असून आता ते सातत्याने राज्याला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी राज्यातील दुष्काळी भागात पाणी सोडून आणि आता सोलापुरात कर्नाटक भवन होणार अशी घोषणा करून ते सातत्याने महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामुळे राज्यातील विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यात शिवसेना (उ. बा. ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून कर्नाटक सरकारसह महाराष्ट्र सरकारला देखील ते लक्ष करत आहेत. मात्र आता हा वाद कमी न होता वाढत चालाल असताना आता पुन्हा नवा सीमावाद जन्म घेऊ पाहत आहे.
नाशिकच्या सुरगणा जिल्ह्यातील सुमारे ५५ गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा सरकारला दिला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सुरगाणा तालुक्याच्या ५५ गावातील आदिवासी गावकऱ्यांची याबाबत आज बैठक होणार आहे. गावकरी कमालीचे आक्रमक झाले असून मुलभूत सोयीसुविधांपासून देखील ते वंचित आहेत. त्यामुळे या सोयीसुविधा द्या अन्यथा आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत असा एल्गार त्यांनी पुकारला आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पांगारगण गावात आज त्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून आंदोलकांची दिशा ठरवण्यात येणार आहे. यात सर्व गावांतील गावकरी हजर राहणार असून याबाबत निर्णय घेणार आहेत. गावकऱ्यांनी सरकार आधीच इशारा दिला असून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधील आदिवासी गावांना सर्व सोयी-सुविधा आहेत. मात्र त्याउलट महाराष्ट्रात आदिवासी बांधव सोयी सुविधांपासून वंचित असल्याची परिस्थिती आहे.
राज्यातील इतर सीमांवरील गावांनी देखील राज्य सरकारला अश्याच प्रकारचा इशारा दिल्याने आता शिंदे-फडणवीस सरकार पुरते कोंडीत सापडले आहे. सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढत चालली आहे. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे दिवसेंदिवस सीमावाद आणखीनच भडकवत असून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.