नाशकात ‘पाणी’ बनलय विष ; २५ हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास

by : ऋतिक गणकवार

इगतपुरी : तालुक्यात नागरिक दुषित पाण्याचे शिकार झाले असून २५ हून अधिक जणांना याचा दुष्परिणाम भोगावा लागला आहे. यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. ही खळबळ उडवणारी घटना शनिवारी रात्री (दि. २९) तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील असून २५ पैकी १७ जणांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात तर काहींवर खाजगी रुग्णालयासह घोटी येथे उपचार सुरू आहेत. घटनेने खळबळ उडाली असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जीवन असलेले ‘पाणी’ विष बनलय.

शनिवारी रात्री फांगुळगव्हाण येथील २५ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. फांगुळगव्हाण आरोग्य उपकेंद्रात उपचार न झाल्याने रुग्णांना खाजगी दवाखाने व इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. १६ ऑक्टोबरला तारांगणपाडा येथील ४० लोकांना दूषित पाण्यामुळे असाच त्रास झाला होता. यात एकाचा मृत्यू देखील झाला होता. या घटनेला १५ दिवस होत नाही तोच दुसरी घटना घडल्याने पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुषित पाण्यामुळे हा त्रास झाला असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिल्याची माहिती तालुका आराग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाणला भेट देत नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी व अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान तालुक्यात अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात लोक पाणी प्यायला देखील कचरत असून प्रशासनाच्या कामाच्या वाभाडे निघताना दिसत आहेत. तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अधिकारी याबाबत काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.