‘कोण आदित्य ठाकरे’ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचा हल्ला बोल..!

पुणे : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा आहे. दरम्यान याच वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पुणे दौरा करत आहेत. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांचा आढावा घेणार असून त्यांचे विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच ते अनेक ठिकाणी भेटीगाठी देखील देणार आहे. या दरम्यानच शिंदे गटाला समर्थन करणारे आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी देखील भेट देणार आहेत. या संदर्भात आमदार तानाजी सावंत यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे . कोण आदित्य ठाकरे? असे म्हणत सवाल उपस्थित केलेला आहे.


पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने होण्याची शक्यताही आहे. कात्रज चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत .तर त्याचवेळी त्याच भागात आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे . या संदर्भात आमदार तानाजी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना “कोण आदित्य ठाकरे काय संबंध एक आमदार आहे तो त्यापेक्षा फारसं महत्त्व मी देत नाही” अशा तिखट शब्दात आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत कोण आदित्य ठाकरे असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या असून शिवसेनेच्या नेत्यांकडून हि प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.