By चैतन्य गायकवाड
एकनाथ शिंदे गट-भाजप या सरकारने आज विधानसभेत विश्वास दर्शक ठराव जिंकला. विद्यमान सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले, तर महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वास दर्शक प्रस्तावाच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केले. महाविकास आघाडीच्या पारड्यातील मतसंख्या घटल्याची दिसून आले.
काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवित विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. कालच्या प्रमाणेच आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावात देखील सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. मात्र आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ९९ सदस्यांनी मतदान केले. महाविकास आघाडीच्या मतांचा आकडा ९९ वर घटल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या कमी का झाली, यावर अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.
२०१९ मध्ये सुरुवातीला ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी झालेल्या बहुमत चाचणीत तब्बल १७० आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या राज्यातल्या राजकीय नाट्याने सत्तांतर घडले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील जवळपास 39 आणि काही अपक्ष आमदारांच्या मदतीने बंड पुकारले. यामुळे अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अतिशय नाट्यमयरीत्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.
मात्र महाविकास आघाडीला सुरुवातीच्या काळात १७० आमदारांचा पाठिंबा होता. मात्र, आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून केवळ 99 मते पडली. काल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून १०७ मते पडली. त्यामुळे महाविकास आघाडीचा मतांचा आकडा घसरल्याचे दिसून येते.
आज झालेल्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या मतदानावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले. ज्येष्ठ सदस्य असलेले काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे सभागृहात उशिरा दाखल झाल्याने, त्यांना देखील मतदानाला मुकावे लागले. तसेच महाविकास आघाडीचे काही आमदार हे अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य कोठडीत असल्याने, ती दोन मते कमी झाली. तर समाजवादी आणि एमआयएम पक्षाचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान घटल्याचे सांगितले जाते.