नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिटीलिंकचा प्रवाशांना फटका ?

नाशिक : अगदी कमी कालावधीत नाशिककरांच्या पसंतीस उतरलेली सिटी लिंक बस (Nashik Citilink Bus) सेवा नव्या वर्षात महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. वाढते डिझेल, सीएनजीचे (CNG) भाव आणि सिटीलींकला येणारा तोटा लक्षात घेता भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. त्यानुसार भाड्यात सुमारे सात टक्के वाढ करण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे ऐन नव्या वर्षात सिटीलींकचा प्रवास प्रवाशांसाठी महाग होणार आहे.

आर टी ओ ला नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीने हा प्रस्ताव सादर केला आहे. तर ही नवीन दर वाढ नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या महिन्यातच झालेल्या कंपनीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती.

सिटीलींक लिंकला दरवर्षी सुमारे २० कोटी रुपयांचा तोटा होत असून महापालिकेकडून केवळ पाच कोटी रुपये दिले जातात. त्यातच गेल्या काही महिन्यात डिझेल आणि सीएनजीचे दर वाढले आहेत. सिटीलिंगच्या अडीचशे बस सीएनजीवर असून पन्नास डिझेलवर चालतात. मात्र दोन्ही प्रकारच्या इंधनात दरवाढ झाली. त्यामुळे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सिटी लिंक दरवर्षी जानेवारी महिन्यातच दरवाढ करेल असा कंपनीचा सुरुवातीपासून निर्णय होता. त्यानुसार ५% पर्यंत सरसकट वाढ करता येते आणि त्यासाठी संचालक मंडळाच्या मान्यतेची गरज नसते. मात्र पाच टक्क्यांपेक्षा अधिक सरासरी साडेसात टक्के वाढ करण्यात येणार असल्याने गेल्या महिन्यात संचालक मंडळाची परवानगी घेतली होती. त्यानंतर आता दरवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजेच आर टी ओ ला सादर करण्यात आला आहे.

या दरवाढीमुळे दिवसागणिक वाढता तोटा लपवण्यासाठी महापालिकेच्या सिटी लिंक प्राधिकरणाने प्रवाशांवर भाडेवाढीचा वरवंटा फिरवण्याची तयारी सुरु असल्याचे म्हंटले जात आहे. जानेवारी महिन्यापासून भाडेदरात ७ टक्के वाढीचा प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केल्यामुळे भाडे वाढ होण्याची साक्याता आहे. त्यामुळे ऐन नव्या वर्षाच्या सुरुवातीस भाडेवाढीला नाशिककरांना सामोरे जावे लागणार आहे.

प्रवाशी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांमुळे घीचघीच होत असते त्यामुळे तिकीटही राउंड फिगर करण्यात येईल. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पासच्या दरातही वाढ होणार आहे तिकीट दरही राउंड फिगरमध्ये आकारले जाणार आहेत. हा देखील अप्रत्यक्षपणे दरवाढीचा फटका असणार आहे.