मोठी बातमी.. ‘या’ उमेदवारांची विधान परिषद निवडणुकीतून माघार..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर (Rajyasabha election) आता राज्यात विधान परिषदेची (Legislative Council) निवडणूक रंगणार आहे. येत्या 20 जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. एकूण १० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीच्या या दिवशी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे पाच अधिकृत उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारीसाठी थोडाच वेळ उरलेला असताना माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला.

आज सकाळ पासूनच सदाभाऊ खोत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, या दोघांनी जरी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला, तरी विधान परिषदेच्या या १० जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे. कारण या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे.

विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. ही मुदत संपण्याच्या काही वेळापूर्वी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या सूचनेनंतर सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या दहा जागांसाठी १३ उमेदवारांनी अर्ज भरला होता.

दरम्यान, या दहा जागांपैकी एका जागेसाठी २७ मतांचा कोटा आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपाचे चार उमेदवार, शिवसेनेचे २ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमदेवार व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र, दहाव्या जागेसाठी भाजपच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने ५ उमेदवार जाहीर केले आहे. त्यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोघे उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस कडून भाई जगताप आणि चंद्रकांत खांडोरे यांनी अर्ज भरला आहे.