चिंताजनक..! राज्यात लम्पीमुळे हाहाकार; पश्चिम महाराष्ट्र रडारवर

लम्पी रोग दिवसेंदिवस वाढत चालला असून आता महाराष्ट्रात भयावह परिस्थिती झाली आहे. या रोगाने बाधित जनावरांचा आकडा चिंताजनक असून आता हे संकटाने मोठे रूप धारण केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये 27 जनावरे या रोगाला बळी पडली आहेत. लासिकारणाने वेग धरला आहे मात्र रोग नियंत्रणात येत नाहीये. राज्याची स्थिती चिंताजनक असून पशुमालकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.


लम्पीच्य रडारवर पश्चिम  महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात लम्पी आजाराचा मोठा संसर्ग होत असून आतापर्यंत 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 321 जनावरांना लागण झाली असून 242 जनावरांवर उपचार सुरु आहेत. कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट असून 9 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 108 जनवरांना लागण झाली असून 76 पशुधनावर उपचार सुरु आहेत. सांगलीमध्ये 105 जनावरे बाधित झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. तीन जिल्ह्यातील प्रशासनाकडून सर्व गायींचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

लसीकरण युद्धपातळीवर सुरु

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक प्रशासनाला नोंदणीकृत नसलेल्या भटक्या गायींचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, भटक्या गायींचे लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून शनिवारपर्यंत कोल्हापूर शहरातील भटक्या गायींचे लसीकरण करण्याचे नियोजन मनपाकडून करण्यात आले आहे. पशुधन मालकांनी स्वत: पुढे येत लसीकरण करून घेतले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात 2.8 लाख नोंदणीकृत गायी असून त्यापेक्षा डबल लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लागण होण्यापूर्वीच लसीकरण तत्काळ करून घेतले पाहिजे. 

जिल्हाधिकारी म्हणतात

कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. खासगी संस्थांकडनही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 8.3 लाख गायी आहेत. गाय पशुधन मालकांनी सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांची वाहतूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनावरांचा गोठा  स्वच्छ असायला हवा.


परिस्थिती चिंताजनक होत चालली असून लसीकरण सुरु आहे तरी साथ आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे पशुमालकांनी तत्पर होऊन ह्या आजारापासून आपले पशुधन वाचवावे, त्यासाठी गोठा व नजीकचा परिसर स्वच्छ ठेवावे, व तातडीने आपल्या जनावरास लम्पी प्रतिबंधक लस देऊन आणावी. लसीकरण आणि स्वच्छता या शास्त्रानेच आपण या लम्पी आजाराला हरवू शकतो त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.