नांदेडच्या रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू ..

नांदेड:- नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र अध्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. मागील २४ तासात १४ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत ७८० रुग्ण भरती झाली आहे. मागील २४ तासांत १२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मृतांमध्ये बालकांचाही समावेश आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे,विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्धड यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील आरोग्य व्यवस्थेसह नांदेड मधील परिस्थितींचा ऑनलाइन पद्धतीने आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकर राजे यांनी महाविद्यालय व रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यात प्रामुख्याने नवजात शिशूनचा वॉर्ड , मेडिसिन वॉर्ड येथे भेटी देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली.

याचबरोबर रुग्णालयाच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची आढावा बैठकही घेतली. गेल्या काही दिवसंपासून नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू तांडव सुरू आहे.

याच रुग्णालयातील एका साडेचार महिन्यांची मुलगी श्रेया हीचा मृत्यू झाला मीडियाला माहिती दिली म्हणून तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले. असा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावलेला आहे. जन्मत:च मुलीच्या हदयाला छिद्र होते. असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

दोन महिन्यापूर्वी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयातच हा रुग्णांचा जीवघेणा प्रकार का घडत आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.