सिन्नर तालुक्यात मोकाट बिबट्याचा वावर कायम, दोघांवर प्राणघातक हल्ला

सिन्नर :- सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांवर एकच रात्री दोनदा हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनदा हल्ले करून मोकाट फिरत आहे. पहिल्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी तर दुसऱ्या हल्ल्यात सैन्यातील जवानाची पत्नी जखमी झाली आहेत. बिबट्याने हल्ला केलेल्या शालेय विद्यार्थी आणि जवानाच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोरे भागात हल्लेखोर बिबट्याने रात्रीच्या वेळी दहशत निर्माण केली आहे. सिन्नरच्या वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत मात्र वनविभागाच्या सापळ्याला हुलकावणी देत बिबट्या नायगाव सह जळगाव, जोंगले टेंभी ,सोनगिरी, वडझिरे, देशवंडी ,ब्राह्मणवाडी या भागात दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात बिबट्याने शिकार करण्यासाठी दुचाकी वरील प्रवाशांकडे मोर्चा वळवला आहे. नायगाव शिवारात वडझिरे रस्त्याला भीमाशंकर नर्सरी जवळ सोमवारी सकाळच्या साडे सातच्या सुमारास घटना घडली.

जळगाव शिवारात अजय सिंह यांच्यासह त्यांच्या मुली मुले लखन व चेतन शेतातील कामे झाल्यानंतर सायंकाळी दुचाकीवरून नायगावला येत होते. नर्सरी जवळ आले असता गिनी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. त्यात लखन यांच्या उजव्या पायावर बिबट्याने पंजा मारला त्यामुळे तिघेही दुचाकीवरून पडले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पुन्हा गिनी गवताच्या दिशेने धूम ठोकली. सिन्नर तालुक्यासह परिसरात बिबट्याचा वावर हा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्याच्याबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून मोकार सुटलेल्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.