गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘त्याने’ हजेरी लावलीच..!

आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशाच्या निनादात वातावरण अगदी चैतन्यमय झाले आहे. लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी सर्व तयारी केली असून ज्या थाटात गणपती बाप्पांचं स्वागत झालं त्याच थाटात गणपती बाप्पांना निरोप देखील देण्यात येत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत अकरा मंडळ ही विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे. दरम्यान बाप्पांना निरोप देण्यासाठी पावसाने देखील हजेरी लावल्याचं दिसून येत आहे. नाशिकमध्ये मिरवणुकीदरम्यान काही काळ पावसाचा शिडकावा झाल्यानंतर मिरवणूकित व्यत्यय आला होता. मात्र, पाऊस थांबल्यावर पुन्हा उत्साहात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने दमदार फायरिंग केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

बाप्पांना निरोप देण्यासाठी पाऊस हजर

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशीही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने स्पष्ट केली होती. त्यानुसार बाप्पांना निरोप देण्यासाठी पावसानेही जणू हजेरी लावलीच.

कालही पावसाची दम’धार’ फायरिंग

नाशिक जिल्ह्यात काल पावसाने रौद्रवतार धारण केले होते. जिल्हाभरात पावसाचं है रौद्ररूप पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे शहरात ठीक ठिकाणी पाणी साचून सर्वत्र पाण्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी देखील बघायला मिळाली. मुख्यतः सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची परिस्थिती होती. द्वारका, मखमलाबाद लिंक रोड, गोविंद नगर, मुंबई नाका या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यातून वाट काढत नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. अशात पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर गणपतीचा देखावा बघण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेवटच्या दिवशीही नागरिकांना गणपतीचा देखावा पाहण्याचा आनंद घेता आला नाही. गणरायाचे आगमन झाले तेव्हा पावसाने हजेरी लावली होती आणि आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी देखील पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे.

राज्यावर कमी दाबाच्या पट्ट्याचा वाढता प्रभाव

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टाही त्याच्या समान्य स्थितीत आहे. परिणामी, चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात बुधवारपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. या स्थितीमुळे राज्यातील सर्वच भागात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ही स्थिती आजपासून १२ तारखेपर्यंत कायम राहील अशीही शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.