पोलिस पत्नीचा नवनीत राणांना सणसणीत इशारा..!

अमरावतीत लव्ह जिहादच्या प्रकरणावरून पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या नवनीत राणा यांना एका पोलिसाच्या पत्नीने ‘सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही’, अशा पद्धतीचा इशारा दिला आहे. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावलं होतं. कॅमेऱ्यासमोर नवनीत राणा यांनी प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी केल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे पोलिस कुटुंब संतप्त झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत जोरदार बाचाबाची करून राडा घातल्यानंतर पोलिसही आक्रमक झाले आहेत. विशेषत: पोलिसांच्या कुटुंबीयांनी या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना पदाधिकारी आणि पोलिस पत्नी वर्षा भोयर यांचा एक बाइट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात त्यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा देत माफी मागण्याचे आवाहन केले आहे.

“नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही. वर्षा भोयर, शिवसेना पदाधिकारी आणि पोलिस पत्नी.

राणा आणि पोलिसांत प्रचंड वाद

लव्ह जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यात नेहमीच्या आक्रमक शैलीत प्रचंड वाद घातला होता. मात्र, नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरडा केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक होताना दिसले. अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात प्रकार घडला होता. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासात चालढकल होत असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावे, पोलिस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करताहेत, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचाही आरोप केला होता. “मी याप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला, हे विचारण्यासाठी पोलिसांना फोन केला तेव्हा माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. राज्य सरकारने तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेत का, हे मला सांगा, असे म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. यानंतर पोलिस कुटुंब आक्रमक होताना दिसून येत आहे पोलिस पत्नी वर्षा भोयर यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा दिला आहे.