निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली, उद्या ठरणार शिवसेना कोणाची?

शिवसेना कोणाची हे सिध्द होण्याची वेळ आता नजीक आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ७ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटांना आपल्या भूमिका मांडण्याचा कालावधी होता ७ ऑक्टोबर उद्यावर येऊन ठेपली असून उदयानंतर शिवसेना कोणाची यावर निर्णय घ्यायला निवडणूक आयोग मोकळे असून अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोग लवकरच चिन्हाचा फैसला करणार असल्याचे समजते आहे. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे.  


ठाकरे गटाची भूमिका

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.

शिंदे गटाची भूमिका

शिंदे गटाचा दावा आहे की,  विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

अंधेरी पोटनिवडणुक

अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे. कारण चिन्हाबाबत केस आयोगाच्या दारात पोहचल्यानंतर लगेच निवडणुका असतील तर अनेकदा चिन्ह तात्पुरतं गोठवलं गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतेय का हे पाहावे लागेल.