सासरा मुलीला नांदायला पाठवत नसल्याचा राग! कोयत्याने निर्घृण हत्या..

सासरा आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून संतापाच्या भरात जावयाने सासऱ्याचा कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडीची येथे शनिवार (दि. १४) मध्यरात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. आप्पासो मल्लाड असे मृत सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार जावयाचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दरीबडची या गावातीलआप्पासो मल्लाड यांची मुलगी तेजश्री हिचे कर्नाटकच्या अथणीतील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी याच्याशी ४ वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीला सर्व ठीक होते मात्र काही दिवसांतच सचिन आणि तेजश्री यांच्यात वाद होऊ लागले. त्याचे कारण सचिन हा तेजश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत होता. त्यांच्यातील वाद कमी करण्याचा प्रयत्न तेजश्रीचे वडिलांनी प्रयत्न केल मात्र, सचिनने तिला मारहाण करणे सुरूच ठेवले होते. अखेर तेजश्री सततच्या मारणीला कंटाळून माहेरी निघून आली होती.

यानंतर सचिनने कोर्टात धाव घेतली. मुलगी नांदायला पाठवत नाही म्हणून त्याने त्यांच्यावर केस केली. तसेच मुलीच्या वडिलांनी देखील घटस्फोटाकरता अर्ज केला. यादरम्यान, सचिनने तेजश्रीला ‘तु नांदायला चल, नाही आलीस तर तुला जिवंत ठेवत नाही ‘अशी धमकी देखील दिली होती.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १३) अप्पासो हे शेतात गेले होते. मध्यरात्री जावई सचिन हा त्याचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी व दोन अनोळखी व्यक्तींसह शेतात आला. त्याने आप्पासो यांचावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर तेथून ते पसार झाले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.