नाशकात संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ९ वर्षीय चिमुकलीचा मांजाने गळा चिरला..

नाशकात मकरसंक्रांत या सणाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे. संक्रात या सणाला गालबोट लागले असून नऊ वर्षीय चिमुरडीचा पंतग उडवण्याचा मांजाने गळा चिरला आहे. ही धक्कादायक घटना दिंडोरी येथील आहे. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरीफान शेख (वय. ९) असे जखमी झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, आरिफा ही दिंडोरी गावामध्ये राहते, काल शनिवारी (दि. १४) नेहेमीप्रमाणे तिची शाळा सुटल्यानंतर ती आपल्या मामासोबत गाडीवरून घरी येत होती, मात्र रस्त्यातच काचेचा मांजा गळ्याला लागल्याने आरिफा गंभीर जखमी झाली. आरिफावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

चिमुरडीच्या आईचा सवाल!

या घटनेननंतर आरीफाच्या आईने सवाल केला आहे त्या म्हणाल्या, ‘जर सरकारने या घातक मांज्यावर जर बंदी घातली आहे तर मग हा मांजा येथे आढळलाच कसा?, हा मांजा वापरणे चुकीचे आहे, लहान लेकरांना काही झाले तर काय करणार, सरकारने या मांजावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, माझ्या लहान लेकराला काही झालं असत तर मी कोणाकडे पाहिलं असत.
हा मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या मातेने केली आहे.

मांजा जीव घेतोय..

जीवघेण्या मांजावर सरकारने जरी बंदी घातली असली तरीही समाजातील काही विकृतींकडून तो सर्रास विकला जातो, व बेजबाबदार नागरिकांकडून तो खरेदी करून त्याचा वापर केला जातो. मात्र यामुळे समाजातील इतर घटकांना याचा नाहक त्रास भोगावा लागतो. यामुळे यंदाही मोठी जीवितहानी झालेली आहे. अनके लोकांना व मुक्या प्राण्यांना यामुळे गंभीर जखमी केले आहे. संक्रांत या आनंदाच्या सणाच्या दिवशी कुटुंबावर संकट कोसळते, त्यांच्या सणावर विरजण येते. त्यामुळे सामाजिक भान ठेवून या जीवघेण्या मांजचा वापर करू नये व कोणी करत असेल तर त्यालाही रोखवे याचे आवाहन करण्यात येत आहे.