मविआ सरकारने राज्यपालांचा अपमान केला होता : चित्रा वाघ

नाशिक : आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्याजागी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. ‘पहिल्यांदाच राज्यपाल हे राज्यातील लोकांसाठी उपलब्ध होते, त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही असे कौतुक करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

‘त्यांनी स्वतःच पत्र लिहिलं होतं की, मला राजीनामा द्यायचा आहे. ती एक प्रोसेस असते, त्यांचा अर्ज जो आहे, तो मंजूर झाला आहे’, असे चित्रा वाघ यावेळी म्हंटल्या.

पहिल्यांदाच राज्यपाल हे राज्यातील लोकांसाठी उपलब्ध होते. राज्यपाल यांनी ज्या ज्या भूमिका मांडल्या, त्या त्या भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्या आहे. तत्कालीन सरकारने राज्यपालांचा अपमान केला होता, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कौतुक केले असून त्या म्हणाल्या, त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही, काही हवं आहे म्हणून मी काम करत नाही, लोकांसाठी काम करणं, याचं समाधान कोणत्याही पदात नाही. असे राज्यपालांचे उच्चार त्यांनी उद्घोशीत केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याबद्दल काही

रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.