मोठया भावाचा छळ सहन होईना, लहाण्याने थेट डोक्यात गोळी घालत विषय संपवला..

मोठा भाऊ कुटुंबाला सतत छळतो, याचा राग डोक्यात ठेऊन लहाण्या भावाने थेट त्याच्या डोक्यात गोळी घालत त्याची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना लातूरच्या भातखेडा गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. सूरज गोविंद मुळे (वय. २५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपी आणि सहआरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भातखेडा गावात मुळे कुटुंबीय राहत होते. त्यात सुरज मुळे आणि धीरज मुळे हे दोघे भाऊ आणि आई व बहीण असा परिवार होता. मात्र यात सुरजला दारूचे व्यसन होते, सुरज दारू पिऊन आई बहिण व लहान भावाला सतत त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी पुणे येथे वास्तव्यास गेले. मात्र एवढं करूनही कमी अधिक प्रमाणात सुरज त्यांना त्रास देतच होता.

या सगळ्याचा राग मनात ठेवून धीरज याने आपल्या भावाला संपवायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने अमर अशोक गायकवाड या मित्राची मदत घेतली. या मित्राला आपल्या भावावर सतत पाळत ठेवण्यात सांगितले. धीरज ने गावठी बनावटीचे एक पिस्तूल खरेदी केले व योग्य वेळ येण्याची वाट पाहिली.

घटनेच्या दिवशी धीरज रात्री पुण्यातून लातुरात आला. तसेच मित्र अमर गायकवाडच्या सोबत त्याच्या मोटारसायकलवरून भातखेडा येथे पोहचला. सुरज घरात झोपलेला असतानाच धीरजने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. ज्यात सूरजचा जागीच मृत्यू झाला. भावाची हत्या केल्यावर धीरज पुन्हा त्याच रात्री पुण्याला निघून गेला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, खुनाचा पंचनामा करत त्यांनी तपास सुरू केला असता, आरोपींपर्यंत त्यांचे हात गेले. पोलिसांनी मुख्य आरोपी धीरज मुळे आणि सहआरोपी अमर गायकवाड यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.