स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवारांनी सरकारला सुनावले

राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार असून सरकारला अधिवेशनात कोंडीत पकडणार असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सुतोवाच  दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना अमाप जाहिरातींवरून पवारांनी खडसावले असून, राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची जोरदार टीका अजित पवार यांनी केली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनात सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली, या बैठकीला मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, जाहिरातींवर 50 कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने 17 कोटी रुपये सरकारने जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा आहे. असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, विरोधकांवर दाखल होणारे खोटे गुन्हे, वाढती महागाई, सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळला, कांदा कवडीमोल भावात विकतोय, अश्या अनेक मुद्य्यांवरून विरोधी पक्ष राज्य सरकारला घेरणार असल्याची माहिती यावेळी पवारांनी दिली आहे.