तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा; संजय राऊत बरसले

संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून स्थापन करण्यात आलेल्या हक्क भंग समितीकडून संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्यावर खुलासा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून आता संजय राऊत हे कमालीचे संतापले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकावा असे संजय राऊत ठणकावून म्हणले आहेत. तसेच हक्कभंग समिती ही पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विधिमंडळ चोर आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते, यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असून त्यांना आज हक्कभंग समितीकडून नोटीस बजावण्यात आले आहे. या नोटीस नुसार त्यांना आपल्या वक्तव्याबद्दल आजच्या आज खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यावरून आता संजय राऊत हे चांगले संतापले असून त्यांनी हक्क भंग समिती पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.

राऊत म्हणाले, “मी अजून नोटीस वाचली नाही,माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही. माझ्या हातात नोटीस असती तर मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल,” असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले, “या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेलं आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल,” असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी राज्य सरकारवर निशाणा ठेवत ते म्हणाले, “आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा. हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे. मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही. ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केलाय.” असा घणाघात राऊत यांनी केला आहे.