नाशिक मधील मोठे थकबाकीदार मनपाच्या रडारवर; 1500 मिळकतधारकांना नोटीसा

नाशिक: एक ते अडीच लाख रूपये इतकी वर्षानुवर्षे थकलेली घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुामरे दिड हजार बड्या थकबाकीदारांना महापलिकेच्या कर विभागाने नोटीसा बजाविल्या असून, पहिल्या टप्प्यात या दिड हजार थकबाकीदारांकडून वसुली केल्यानंतर उर्वरित पावणे तीन लाख थकबाकीदारांकडून वसूली केली जाणार आहे.

चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेने कर विभागाला २१०कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षी हेच उद्दिष्ट अगोदर १५० कोटी होते. त्यात वाढ करण्यात येवून मार्च अखेर १८० कोटी करण्यात आले.

यंदा उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी कर विभाग एप्रिल महिन्यापासूनच कामाला लागला असून, त्यासाठी सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांना घरपट्टीचे बिले वाटप करण्यात आले असून, आता प्रत्यक्ष वसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातही एक ते अडीच लाख रूपयांची वर्षानुवर्षे थकीत असलेली थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात अडीच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १ हजार ४२५ थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे.