धक्कादायक..! मालेगावात स्विमिंग पूलमध्ये अवघ्या १९ वर्षाच्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात एका एकोणावीस वर्षाच्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. २८ ऑगस्टला ही घटना घडली होती आणि आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

शिवाजी नगर परिसरात असलेल्या अस्पायर क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये जयेश भावसार हा रविवारी नेहमीप्रमाणे पोहोण्यासाठी आला होता. मात्र यावेळी पोहत असतानाच त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघताच इथं उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला बाहेर काढून छाती आणि पोट दाबत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि जयेशचा मृत्यू झाला.

मागील आठवड्यातच नाशिकचे तरुण युवक व्यावसायिक कौस्तुभ हुदलीकर यांचा हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंगला असताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर हृदयविकाराने मृत्यू होण्याची नाशिकमधील एवढ्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी परभणीमध्ये देखील एका बॅडमिंटन खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर वीस वर्ष तरुणाचा पोलीस भरती दरम्यान धावताना निधन झाल्याच्या घटना आहेत. त्यामुळे कुठेतरी तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान शरीर फिट ठेवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त व्यायामाने हे प्रकार घडू शकतात अशी माहिती आहे. हृदयाच्या, शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला अथवा शरीराला ताण दिला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि तुमचा जीवही जाऊ शकतो ज्याला “सडन कार्डियाक डेथ”असे म्हणतात.