राजधानीत राहत होती चीनची गुप्तहेर, अटकेनंतर मोठी माहिती आली समोर

दिल्लीत चीनच्या एका महिला गुप्तहेराला अटक करण्यात आली (A Chinese woman spy arrested in Delhi) आहे. ही महिला बौद्ध भिक्खूचा वेश धारण करून राहत होती. तिने केलेला वेश पाहता कोणीही तिच्यावर संशय केला नाही. मात्र ती चीनची गुप्तहेर निघाली. देशाच्या राजधानीत घडलेल्या थरारक घटनेनंमुळे अनेकजण हैराण आहे. महिलेला अटक केल्यानंतर नेपाळी नागरिक असल्याची कागदपत्रं तिच्याकडे सापडली. त्यावर तिचे नाव डोल्मा लामा असे लिहीलेले होते.

दिल्ली पोलिसांनी या महिलेला संशयाच्या आधारे अटक केली. उत्तर दिल्लीतील तिबेटी निर्वासितांच्या वस्तीतून तिलि अटक करण्यात आली आहे. महिलेचे वय ५० आहे, ती स्वत:ला नेपाळी सांगून पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र पोलिसांनी तिला नेपाळी भाषेत बोलायला लावलं तेव्हा ती गडबडली. तिला नेपाळी भाषा येत नव्हती. मात्र ओळखपत्रात तिचा पत्ता नेपाळची राजधानी काठमांडू येथील होता. तिला नेपाळी येत नसल्याने पोलिसांचा संशय दृढ झाला. म्हणून तिने कहाणी रचत चीनमधील कम्युनिस्ट नेते आपल्या जीवावर उठले आहेत ज्यामुळं आपण पळ काढला असं सांगितलं. मात्र चौकशीअंती तिचे खरे नाव काई रुओ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या महिलेकडे नेपाळची कागदपत्र सापडली असली तरीही ती चीनसाठी हेरगिरी करत असल्याचं तपासातून उघड झालं आहे. देशविरोधी कारवाया करण्यात या महिलेचा सहभाग आढळला आहे. २०१९ मध्ये चिनी पासपोर्टआधारे तिने भारतात प्रवेश केल्याचं उघड झालं. या चिनी महिला हेराच्या अटकेनंतर दिल्लीत हायअलर्ट देण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. २०१९ मध्ये तिनं चीनच्या पासपोर्टवर भारत दौरा केला होता. त्यानंतर ती परतली मात्र तिथून ती चीनला न जाता नेपाळला गेली, तिथे तिने डोल्मा लामा नावाने कागदपत्र तयार केले आणि पुन्हा भारतात परतली. ही महिला गुप्तहेर चीनच्या हैनान प्रांतातील असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार ही महिला भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती चीनमध्ये देत होती. सदर प्रकरणाचं गांभीर्य पाहता रॉ, आयबी आणि लष्कराकडून आता तिची चौकशी करण्यात येणार आहे. तेव्हा आता या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या महिलेच्या संपर्कात आणखी कोण कोण आहे, यासंदर्भातील माहितीकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.